पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला महापालिका सक्षमपणे करत असून आरोग्य यंत्रणा अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचाच भाग म्हणून महापौर विकास निधीतून शहराला ९ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महापौर विकासनिधीच्या माध्यमातून पुणे शहरासाठी ९ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या असून याचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष आ.मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या ९ रुग्णवाहिकांमध्ये २ अद्ययावत अशा कार्डियाक, २ रुग्णवाहिका आणि ५ शववाहिकांचा समावेश आहे. या लोकार्पणावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाची साथ पुणे शहरात आल्यापासून आजतागायत कोरोना निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आरोग्य व्यवस्थाही वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तम दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.