दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहे. दिल्लीत काल मंगळवारी शेतकरी रॅली निघली होती. त्या दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरुचं आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, सोशल मीडियावरून तर दिल्ली हिंसेप्रकरणी स्वराज अभियानचे नेते आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या अटकेची मागणी होत आहे. शेतकरी नेत्यांमुळेच ही हिंसा भडकल्याचा आरोप नेटकऱ्यांमधून होत आहे. भारतीय किसान यूनियनचे नेते राकेत टिकैत, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव आणि शेतकरी नेते दर्शनपाल सिंह यांना अटक करण्याची मागणी होत आहे.
योगेंद्र यादव हे सामाजिक कार्यकर्ते असून ते स्वराज अभियानचे प्रमुख आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचा सल्ला दिला होता. शेतकरी आंदोलनाला कोणतीही चूक होउ नये, याची त्यांनी दक्षता घेतली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरच या आंदोलनाचा कसा फोकस राहील आणि त्याला राजकीय वळण मिळणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे. मात्र, तरीही योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.