करुन दाखवलं : शिवसेना खासदाराच्या निधीतील दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

24

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागावरील रुग्णांचा तसेच वाहनांचा ताण ओळखून शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून पैसा उपलब्ध करीत दोन अद्यावत अशा रुग्णवाहिका खरेदी केल्या असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्या रुग्णवाहिका आरोग्य विभागास सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतूल सरोदे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार जाधव यांनी या दोन रुग्णवाहिका सेलू व मानवत येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता सुपूर्द केल्या जात आहेत, असे स्पष्ट केले. पूर्णा, गंगाखेड, जिंतूर व पालम येथील रुग्णांकरिता रुग्णवाहिकांची गरज आहे. त्याही मागणीची निश्‍चित दखल घेतली जाईल, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला.