उद्या होणारी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.यावर तरुण पीढीच्या संकल्पनांनुसार विकासकामे व्हायला हवीत, तुमच्या जुन्या वेळकाढू (टाईमपास करण्याच्या) पद्धतीने विकास शक्य नाही, असा टोला युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी भाजप नेते अतुल भातखळकर यांना लगावला आहे.
आजच्या कोरोना साथीच्या काळात ऑनलाईन बैठका हा महत्वाचा उपाय ठरला आहे. भातखळकर यांनी त्यावरून ठाकरे यांना लक्ष्य करताना ही महत्वाची बैठक प्रत्यक्ष घेण्याचा आग्रह केला होता. प्रत्यक्ष बैठक घेऊन थेट टीका ऐकण्याचे धाडस दाखवा, असाही टोमणा भातखळकर यांनी मारला होता.
त्या वादात सिद्धेश कदम यांनी ठाकरे यांची बाजू घेताना ऑनलाईन बैठक घेण्यात गैर काय असे विचारले आहे.तुमच्या जुन्या आणि टाईमपास करण्याच्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास होणे शक्य नाही, असे ट्वीट कदम यांनी करून नवे आधुनिक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
या विषयावर ईसकाळ वेबसाईटवर आलेल्या बातमीचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे. त्याला कदम यांनी ट्वीट करूनच वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे.