देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

23

 हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला दिला.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यातील कोरोनाचा संसर्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न, मेट्रो कारशेडचा तिढा आणि कंगना व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद अशा विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही एक पुस्तिकाच प्रकाशित करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आजही कोरोना उतरणीला लागला असताना सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.यावेळी सध्या गाजत असलेल्या कांजूरमार्गच्या प्रश्नावरूनही फडणवीस यांनी राज्य सरकारची कोंडी केली. कांजूरमार्गचा प्रश्न न्यायप्रविष्ठ नसल्याचे सांगत तांत्रिक मुद्दा उपस्थित केला

कंगना आणि अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राविषयी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई करताना सरकारने कायद्याचा आधार घेतला पाहिजे होता, असा टोलाही त्यांनी लगावला.राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असा टोला त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून लगावला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मदत करणे हा मुख्यमंत्रिपदाचा अपमान नव्हे का, असे ते म्हणाले.