राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, आता त्यांना सदरील प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं.
रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे अरोपामुळे त्रस्त झाले होते. मात्र आता रेणू शर्मा या तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सगळ्यात किंगमेकर असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते