धनंजय मुंडे केस : बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर करवाई करा; ‘या’ भाजप नेत्याची मागणी

55

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, आता त्यांना सदरील प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे अरोपामुळे त्रस्त झाले होते. मात्र आता रेणू शर्मा या तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेणू शर्मा यांच्या तक्रार मागे घेण्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणू शर्मा यांना धारेवर धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते. त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे.

सदरील प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.