पराक्रमी योद्ध्याप्रमाणे धनंजय मुंडेंचं स्वागत होतंय; सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासावी लागेल : तृप्ती देसाई

13

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आलेले संकट टळले असं वाटतं असतानाच, धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यात  १४ वर्षाची मुलगी असून ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे. सोबतच पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे.

या सर्व प्रकरणावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.  ‘धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत, धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धा आहेत अशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती, त्यानंतर रेणू शर्मा यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता.

त्यानंतर आज पुन्हा करुणा शर्मा यांनी जर असा तक्रारी अर्ज दिला असेल तर, धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल, आणि असेच चालू राहिले तर काही काळाने जर एखादा नेता, एखादा मंत्री बलात्काराचे आरोप असलेले किंवा आरोपी जरी ठरला तरी त्याचे स्वागत करतील.

राष्ट्रवादी परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का हे पण पाहिले पाहिजे आणि त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे’ असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.