सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्या सूचनेनंतर सामाजिक न्याय विभागाने मंत्रिमंडळा समोर मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला होता, त्यास मंत्रिमंडळाने एकमुखी मान्यता दिली आहे.
राज्यात विविध शहरात व ग्रामीण भागात काही वस्त्यांना जातीवाचक नावे दिल्याचे दिसून येते, उदा. महारवाडा, मांगवाडा, ब्राह्मणवाडा; अशी जातीवचक नावे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत, ही बाब विचारात घेऊन राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना विविध महापुरुषांची किंवा तत्सम नावे उदा. समता नगर, भीमनगर, ज्योतिनगर, क्रांतीनगर या प्रकारची नावे देण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी देण्यात आला होता.