राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यात लोकसभा मतदार संघात करण्यात आलेल्या कामाच्या श्रेयवादावरून शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. याच मुद्द्यवरून या दोन्ही नेत्यांमध्ये तू-तू-मै-मै सुरु झाले आहे.
या संदर्भात बोलताना आढळराव म्हणाले की, काही लोक घरात बसून अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार माहितीसाठी पाठविलेल्या मंजूर कामांच्या याद्या जशाच्या तशा स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करून खोटे श्रेय लाटत आहेत असे नाव न घेता त्यांनी खासदार डॉ आमोल कोल्हे यांना टोला लगावला होता. मी आजवर कधीही न केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी धडपड केली नाही. मात्र, खोटं बोल पण रेटून बोल अशा स्वरूपाचे प्रकार सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला अनुभवायला मिळत आहे. मी प्रयत्नपूर्वक मंजूर केलेल्या कामांचे श्रेय लाटणाऱ्यांनी स्वतः केलेला पाठपुरावा लोकांसमोर उघड करावा, अन्यथा जनतेची जाहीर माफी मागावी असे आव्हान त्यांनी केले आहे.
मागील वर्षी करोना, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आंबेगावसह खेड तालुक्यातील गावांचा पाहणी दौरा केला होता. यावेळी नायफड, धाबेवाडी आदी भागातील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली होती. तसेच रस्त्यांची ग्रामस्थांसोबत पाहणी करून तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चव्हाण, कार्यकारी अभियंता बाप्पा बहीर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या कामांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यामुळे खासदार नसलो तरी देखील ग्रामस्थांनी कामे मार्गी लावण्यासाठी आग्रही मागणी केली होती.