औरंगाबादेतील बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात कर्तव्यावरील आरोग्य अधिकारी संजय गोरे यांना दारू पिऊन आलेल्या स्थानिक गुंडाकडून रविवारी मारहाण झाल्याची घटना घडली होती. यावेळी गोरे आणि उपस्थित नर्स यांना आरोपीने मारहाण करत शिवीगाळ केली होती. मात्र आरोपीची परिसरात दहशत असल्याने गोरे यांनी तक्रार देण्यासाठी नकार देत ते बिडकीन वरून स्थलांतरित झाले होते.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बिडकीनला जाऊन गोरे यांची भेट घेत, धीर दिला. तुम्ही म्हणजे माझे कुटुंब आहात आपल्या सगळ्यांना मिळून जिल्हयाची काळजी घ्यायची आहे.
मात्र, हे होत असताना जर काही अन्याय होत असेल तर कायदेशीर पद्धतीने आवाज उठवलाच पाहिजे, तसेच अन्याय सहन करणे हा मोठा गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितले. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि एक जिल्हाधिकारी नाही तर मोठा भाऊ म्हणून तुमच्याकडे आलो आहोत अश्या शब्दात त्यांनी सांत्वन केले.
स्वतः गुन्हा दाखल करून घेतला!
त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ. गोरे यांना स्वतःच्या गाडीत बसून बिडकीन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. गुन्हा दाखल होण्याच्या सर्व प्रक्रिया होइपर्यंत जिल्हाधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर गोरे यांना पुन्हा रुग्णालयात सोडत तुमच्या पाठीमागे प्रशासन खंबीर आहे असे संगीतले.