मुंबई महापालिका कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली. कोरोनाचं संकट असल्यामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा बोनसमध्ये फक्त 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी ही मोठी भेट दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे. शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली.