‘महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करू नका; केंद्र सरकारकडून औषध कंपन्यांवर दबाव’

156

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नसून केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा पुरवठा महाराष्ट्राला करू नका. अन्यथा परवाना रद्द करू असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला असून राज्य सरकारने रेमडेसिवीर औषध निर्माण कंपन्यांकडे विचारणा केली असता ही माहिती समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

रेमडेसिवीरचे भारतात १६ निर्यातदार आहेत, ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या एकूण २० लाख कुप्या आहेत. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्‍या सात कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या सात कंपन्या ही जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.