लोकसभा सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, खासदारांपेक्षा सामान्य जनतेकडूनच या हेल्पलाइन क्रमांकावर मोठ्या प्रमाणात संपर्क साधला जात असल्याची बाब समोर आली आहे. हेल्पलाइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.
खासदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात दूरध्वनी येत आहेत. यापैकी अनेकजण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचे आहे, त्यांना भेटण्याची ईच्छा आहे असे बोलतात. काही महाभागांना तर मोदी यांना सल्ला आणि सुचनासुद्धा द्यायच्या असतात. असे या विभागातील एका कर्मचार्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगीतले आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाइन सुरू केली होती. याचा उद्देश सभागृहातील चर्चेवेळी खासदारांना माहिती आणि अन्य बाबी लगेच उपलब्ध होऊ शकतील, असा होता. या हेल्पलाइनचा उपयोग खासदार कधीही आणि कोणत्याही वेळेस करू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले. मात्र खासदारांऐवजी सामान्य जनतेकडूच यावर मोठ्याप्रमाणात कॉल येत आहेत.
कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक कॉल ग्रामीण भागातून येत अाहे. लोकसभा टी.व्ही.वर हे हेल्पलाईन नंबर सातत्याने झळकवण्यात येत होते. लोकसभा टी.व्ही. ग्रामीण भागात सर्विधिक बघितले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातून बरेच कॉल येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या हेल्पलाइन क्रमांकावर अनेकांनी कोरोना लस कधी मिळणार? तसेच शेतकरी आंदोलनावरही विचारणा केली. विशेष म्हणजे या हेल्पलाइन क्रमांकावर आतापर्यंत केवळ ४ ते ५ खासदारांनी संपर्क साधल्याची माहिती यावेळी देण्यात आली.