प्रतिनिधी: संजय शर्मा
औरंगाबादेत एका डॉक्टरने कोरोनाग्रस्त महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची महानगरपालिकेने तातडीने दखल घेतली आहे. महापालिकेने या विकृत डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी नीता पडळकर यांनी ही दिली आहे.
संभाजीनगर येथील पदमपुरा परिसरातील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला दाखल झाली होती. तिला तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरने त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. कोरोनाग्रस्त असल्याने त्या महिलेने त्यांना आपला नंबर लगेच दिला. मात्र हा डॉक्टर सातत्याने तिला फोन करत होता. तिला थोडा अंदाज आल्याने तिने डॉक्टरचे फोन घेणं टाळलं होतं.
महिला फोन घेत नसल्याने हा विकृत डॉक्टर रात्री दोन वाजता तपासणीच्या बहाण्याने महिलेपाशी आला होता. त्याने महिलेला उठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. डॉक्टरने महिलेला गच्चीवर नेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र महिलेने त्याला विरोध करत आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिच्या आरडाओरड्यामुळे कोविड केंद्रात एकच गोंधळ उडाला. अन्य कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा त्यांना पीडिता रडनताना दिसली होती.
महिलेच्या घरच्यांना या प्रकाराबाबत कळाले तेव्हा त्यांनी रुग्णालयात जाऊन या विकृताला शोधून काढत, चोपून काढले. हा प्रकार महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांना कळल्यावर त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या डॉक्टरची रुग्णालयातून हकालपट्टीही करण्यात आली आहे.