राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील हॉटेल आणि बार चालक यांच्या मदती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यावर आता शेतकरी नेते पाशा पटेल यांनी जोरदार टीका केली आहे.
करोनाच्या संकटात राज्यातील बारमालक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीस धावून जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शेतकरी कुटुंबांचा आक्रोश ऐकू येत नाही काय? त्यांचे अश्रू दिसत नाहीत काय?
शेतकरी नेते व जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या पवारांनी आता राज्य सरकारचे कान पिळून समस्याग्रस्त शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून द्यावा, अशा शब्दांत पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
मलाला भाव नाही, सरकारकडून मदत नाही. जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद, बाजार समित्या बंद आहेत. हातात पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने ६ हजार रुपये जमा करावेत व शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी, बारमालक आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे सरकारला एक पत्र लिहा, असा सल्ला पटेल यांनी दिला आहे.