पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना 16 डिसेंबर 1971 या दिवशी घडली होती. आज या घटनेस 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील लोणंद मधील भैरवनाथ डोंगर ग्रुपने हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.या ग्रुपमधील 41 सदस्यांनी तारकर्ली-मालवण समुद्रात 321 फूट तिरंगा ध्वज फडकवून हिंदुस्थानी सैन्याच्या शौर्याला सलाम करत समुद्रामध्ये हा दिवस अनोख्या रीतीने साजरा केला आहे. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने तारकर्ली – मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला होता.
अडव्हेचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांनी हा क्षण टिपला आहे. ही मोहिम एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी यांच्या संकल्पनेतून आणि डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. समुद्रामध्ये 3 किमी आतमध्ये जाऊन त्यांनी 321 फूट लांब आणि 10 फूट रुंद ध्वज फडकवला आहे. लोणंद येथील भैरवनाथ डोंगर ग्रुप मधील तरूणांनी ही अनोखी मानवंदना दिली आहे.