पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार करू नये, अशी विनंती राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
बंगालमधील काँग्रेस नेते, खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार आणि ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांना यासंदर्भात पत्र लिहले आहे. तुम्ही पश्चिम बंगालच्या प्रचारापासून दूर राहावे, अशी विनंती भट्टाचार्य यांनी पत्राद्वारे या दोन्ही नेत्यांना केली आहे.
बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधक हा ममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे शरद पवार हे ममता यांच्या व्यासपीठावर प्रचारासाठी गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार करू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपने दिग्गज फळी प्रचारासाठी उतरवल्याने ममता यांच्यासमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे देशपातळीवरील भाजप विरोधी अनेक नेत्यांनी ममतांचा प्रचार करावा असा एक मतप्रवाह भाजपविरोधी पक्षांमध्ये आहे. त्यामुळे शरद पवार हे ममतांच्या मदतीला जाणार का ? पवरांची भूमिका नेमकी काय असणार… हे थोड्याच दिवसात समोर येईल.