‘आई म्हणायची भांडी वाजवू नको, दळभद्री येते; मोदी महाराजांनी देशाला थाळी वाजवायला लावली’

लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिदय्र येतं. पण पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताट वाजवायला लावली, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरात केली.

चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. 2019 मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा यावेळी नाना पटोले यांनी केला.
ते गुरुवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलत होते.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. मोदी महाराजांनी जनता कर्फ्युच्या नावाखाली थाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यानंतर दिवे लावण्याचा उद्योग केला. या काळात मुस्लिम समाजामुळे कोरोना पसरतो, असं सांगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. असेही पाटोले म्हणाले.

आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी यावर उपाययोजना जाहीर करायला हव्या होत्या. देशात सध्याच्या घडीला केवळ दोन कंपन्यांनाच लस तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. आपले शत्रू असलेल्या पाकिस्तानला लस पुरविली जात आहे. मात्र, राज्यांना लसी दिल्या जात नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले.