भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर काल दगडफेक झाली. नड्डा यांची गाडी बुलेटप्रुफ असल्यानं त्याचं नुकसान झालं नाही. पण भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीवर पडलेल्या दगडविटांची दृश्यं टीव्हीवर दिसली.आगीशी खेळू नका…माफी मागा…हा इशारा आहे.असे म्हणत बंगाल राज्यपाल जगदीप धनखर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे.
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर काल बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं कारवाई सुरु केली आहे. प. बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयानं 14 डिसेंबरला दिल्लीत हजेरीचे आदेश दिले आहेत. बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यपालांना रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं. त्यांनी तो अवघ्या तासांत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली
एप्रिल-मे मध्ये बंगालमध्ये निवडणुका आहेत. त्या आधीच बंगालचं मैदान तापलं आहे.अमित शाह 19 डिसेंबरला बंगालचा दौरा करण्याचीही शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी मात्र तृणमूल काँग्रेसवरचे हे आरोप नाकारले आहेत. शिवाय भाजपवाले स्वताच स्वतावर असे हल्ले घडवून आणत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय.केंद्रातल्या भाजप सरकारनं याबाबत गंभीर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बंगालची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरु आहे का असाही सवाल उपस्थित होतोय.