गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना नावाच्या संसर्गजन्य रोगाने जगाला हादरवून सोडलं होतं. संपूर्ण देशाला करोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारावरील लसीची कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर ही लस प्रत्यक्षात आली असून, त्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
या कोरोनावरील लसिला परवानगी देणारे भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे परभणीचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ही बाब परभणीकरांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी अभिमानाची ठरली. देशातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत दोन लसींना मंजुरी दिली. करोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस ‘डीसीजीआय’कडे केली होती. त्यानुसार भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणूगोपाल सोमाणी यांनी नॅशनल मेडिकल सेंटर येथे रविवारी पत्रकार परिषद घेत, या लसींना परवानगी दिल्याची माहिती दिली होती.
डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे मूळचे परभणी जिल्ह्यातील बोरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंबीय परभणीतील श्रीरामनगरात वास्तव्याला आहे. त्यांचे वडील स्टेट बँकेतून निवृत्त झाले असून, त्यांना एकूण तीन मुले आहेत. त्यापैकी डॉ. वेणुगोपाल हे ज्येष्ठ पुत्र आहेत. अन्य दोन पैकी लहान मुलगा ठाणे येथे सरकारी नोकरीत असून, दोन क्रमांकाचा मुलगा शेती पाहतो.
यावेळी डॉ. वेणूगोपाल यांचे कार्य आमच्यासह परभणीकरांचा गौरव असल्याचे त्यांचे वडील गिरधारीलाल सोमाणी यांनी सांगितले. त्यांच्या आई लीलाताई, बंधू मनोज यांनीही त्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.डॉ. वेणुगोपाल यांचे शालेय शिक्षण बोरी या खेडेगावात झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथे झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथून औषधनिर्माण-शास्त्र शाखेची पदवी घेतली, आणि त्या ठिकाणीच त्यांनी पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई येथे औषध निर्माण खात्यात सुरू झालेले डॉ. वेणूगोपाल २८ वर्षांपासून या खात्यात कार्यरत आहेत.