ऑटो उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू हणेगाव- लोणी रस्त्यावरील घटना, एकजण जखमी

बातमीदार – सिकंदर शेख

देगलूर (जिल्हा नांदेड) :
हणेगाव (ता. देगलूर) येथे शेतीमालाची वाहतूक करून रिकामी परतणाऱ्या ऑटोचालकाचा ऑटोवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात सदरील ऑटोचालक जागेवर ठार झाल्याची घटना हणेगाव- लोणी रस्त्यावरील सिद्धेश्वरतांड्याजवळ शनिवारी (दि. ५) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. चालकासोबत प्रवास करणाऱ्या अन्य एक सहप्रवासी या घटनेत जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील वाहन क्रमांक एम. एच. २६ एडी. ७०५१ या वाहनातून वाहनचालक संतोष बाबुराव वल्लूरे (वय : ३२) रा. लोणी हा गावातून शेतीमाल विक्रीसाठी हणेगाव येथे नेऊन घराकडे परतत होता. सदरील ऑटोचालक हणेगावहुन घराकडे परतत असताना हणेगाव- लोणी रस्त्यावरील सिद्धेश्वर तांड्याजवळ ऑटो आलेला असताना ऑटोचालकाचा ऑटोवरील ताबा सुटल्याने सदरील ऑटो रस्त्यावरच उलटला. या अपघातात ऑटोचालक संतोष वल्लूरे याच्या डोक्यास जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

ऑटोचालकासोबत सहप्रवासी असलेल्या गजानन हणमंत ईबीते यास किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातातील मृताचा रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी या प्रकाराची माहिती देताच मरखेल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, उपनिरीक्षक नागनाथ सुर्यतळ, अजित बिरादार, पोलीस कर्मचारी प्रभाकर गुडमलवार, बालाजी पुरी, विष्णू चामलवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन प्रक्रियेसाठी उपरोक्त मृतदेह हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी मरखेल पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यतळ हे करीत आहेत.