शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने सकाळी छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून सरणाईकांच्या घरी हे पथक पोहोचले होते. त्यांनतर त्यांची मुले विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांच्याही घरी ईडी पथक चौकशीसाठी पोहोचले होते. दरम्यान विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारावर असल्याची शक्यता आहे.
आज सकाळी 8 वाजता ईडीचे पथक सरनाईकांच्या निवासस्थानी तसेच व्यावसायिक कामकाजांच्या ठिकाणी दाखल झाले. सरनाईक कुटूंबीय टॉप्स ग्रुपचे प्रमोटर्स आहेत. त्यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यावेळी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ट्रेंड भाजपने सुरू केल्याची टिका त्यांनी केली आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये किती भाजप नेत्यांवर कारवाई केली आहे असेही त्यांनी विचारले आहे.
दरम्यान, सीबीआय असो ईडी असो आम्ही कोणाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ” “केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून हे सरकार आमच्या दबावाखाली येईल असं कोणालाही वाटत असेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार, आमचे नेते कोणालाही शरण जाणार नाहीत” अस संजय राऊत म्हणाले.