बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ‘कोरोना’ प्रतिबंधित लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. असात्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे शासकीय कार्यालयात व इतर खासगी आस्थापनेत ५० टक्के उपस्थितीमध्ये काम करणे गरजेचे आहे. प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या कामावर तसेच विकास कामांवर परिणाम होणार नाही, याचे नियोजन करावे. ऑक्सीजन बेडची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी.