आनंद घ्या, पण भान ठेवा ! : उध्दव ठाकरे

1


दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले, बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्वधर्मीयांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरू नका.