मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता. या नामांतराच्या मुद्द्यावर नेते प्रतिक्रिया देत आहेत.
औरंगाबाद शहरातील कलाकट्टा संस्थेचा पाचवा वर्धापन कार्यक्रमानिमित्त शिवसेना आ.अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद नामांतराबाबत ते बोलत होते.
संभाजीनगर नामकरण व्हावे याकरिता 2 वेळेस महापालिकेने ठराव घेतला होता. 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात संभाजीनगर नाव ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते रद्द झाले. त्यावर पुन्हा एकदा मनपाने ठराव पाठवला. आता पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. मुस्लिम देखील आपल्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही. मग शहराचे नाव औरंगाबाद का असावे असा सवाल अंबादास दानवे यांनी यावेळी विचारला.