औरंगाबाद नामांतर मुद्द्यावरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. इतकच काय तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधे शाब्दिक युद्ध पाहायला मिळतंय. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.
मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका संजय राऊत यांनी सामनातून केली होती. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत, असा मजकूर या पत्रकात लिहला होता.
त्यावर आता चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळासाहेब थोरात यांची समजूत काढत प्रतिउत्तर दिलं आहे. बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होटबँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये.
बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. मात्र, औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, हे निश्चित आहे. आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले