बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये आज पत्रकार परिषद घेत पाठिंबा जाहीर केला.
इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल याबाबत शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच इथल्या मराठी भाषकांना, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शुभम शेळके यांना पाठिंबा देत असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.
“भाजप मागील पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होती, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी येथे येऊन केले,” असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.