उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुजय विखे यांना शाब्दिक टोला लगावला. लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीर या औषधाचा साठा करणे अयोग्य असल्याचे अजितदादा पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अनेक जिल्ह्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. मात्र हे करताना त्यांनी जिल्हाधिकारी किंवा शहरांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे रेमडेसिवीर सुपूर्द केले. प्रशासन जी यंत्रणा राबवते त्यांच्याकडे ही गोष्ट देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुजय विखे यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच ते जनतेच्या हिताचे आहे का हे तपासून पुढील निर्णय घ्यावे, असेही अजितदादा पवार म्हणाले.
अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी आपल्या ओळखीचा वापर करत खाजगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन नगरला आणले होते. तसा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांच्याबाबत साधक बाधक चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात झाली. त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन आणून साठेबाजीचा आरोपही अनेकांनी केला आहे.