देशात प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे, राहुल गांधी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र !

6


देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. त्यातच येत्या १ मे पासून संपूर्ण देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांना सुद्धा कोरोनाची लस घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे सिरम संस्थेच्या कोविशील्ड लसीच्या किमतीवरून केंद्र सरकारवर विरोधकांनी हल्लबोल केला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.


या संदर्भात त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, असं टीकास्त्र त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सोडले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सुद्धा लसीच्या किमतीवरून केंद्र सरकारला पत्र लिहिले होते.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २० एप्रिलला करोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.