संतती हीच संपत्ती

10

नागोराव सा. येवतीकर

बापाने मुलांसाठी खुप संपत्ती कमाविली पण मुलगा निघाला बेअक्कली तर या संपत्तीचे करायचे काय ? नुकतेच एका बातमीमध्ये वाचण्यात आलेली ही घटना आहे. खरंच माणूस सुखी जीवन जगण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करतो. आपली मुलंबाळ सुखात राहावीत त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून दिवसरात्र काम करतात. संपत्ती जमविण्याचा मूळ हेतू एकचअसतो ते म्हणजे आपल्या नंतरची पिढी सुखात नांदावी त्यांना कसलाही त्रास होऊ नये. पण आपली संतती जर चांगली, संस्कारी निघाले नाही तर जमवलेली संपत्ती संपून जायला किती वेळ लागेल ? झाड तोडणे सोपे आहे पण झाडाची मशागत करून झाडाची वाढ करणे खूप कठीण काम आहे. तसेच पैशाच्या बाबतीत आहे. संपत्ती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही पण चांगली संतती निर्माण केल्यास संपत्ती कधी ही नष्ट होणार नाही त्याउलट त्यात वृद्धी होत राहील. जगात असे अनेक उदाहरण आहेत ज्यांनी संपत्ती सोबत चांगली संतती देखील कमावली म्हणून त्यांचे नाव आज ही घेतल्या जाते.

आपली संतती चांगली निर्माण होण्यासाठी दिवसरात्र पैश्याच्या मागे धावून काही फायदा नाही. एकवेळ कमी संपत्ती कमाविली तर तेवढं नुकसान होणार नाही मात्र संपत्तीच्या नादात संतती जर बिघडली तर सर्व काही कमावून देखील नुकसान आहे. म्हणून आपल्या कुटुंबाकडे वेळ काढून लक्ष देणे अत्यावश्यक आहे. बहुतांश वेळा पालकांकडून या नकळत चुका होतात. जेंव्हा हे सर्व कळते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. जे पालक मंडळी आपल्या कुटुंबाकडे वेळात वेळ काढून लक्ष देतात त्यांच्या घरातील संतती ही संस्कारी निर्माण होऊ शकते.

आज रोजचे वर्तमानपत्रउघडले की एक तरी बातमी वाचतो बलात्काराची, अत्याचाराची, खून, दरोडा, चोरीची. हे सर्व अनैतिक कार्य करणारे कोण आहेत ? कोणाचे तरी संतती आहेत. त्यांना हे सर्व करायला कोणी शिकविले ? ते त्या रस्त्यावर जाण्यास मजबूर का झाले ? या सर्व बाबीचा विचार केल्यास त्या सर्व समस्यांची उत्तरे पालकांजवळ येऊन थांबतात. पालकांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे अशी संतती निर्माण झाली. घरातील पालकांचे वागणूक आणि वर्तन मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करण्यास भाग पडते. लहानपणी मुलांच्या प्रत्येक क्रियेकडे गांभीर्याने घेणे गरजेचे असते. मात्र बहुतांश वेळा अजून लहान आहे म्हणून वेळ मारून नेतो तीच बाब पुढे अराजकता माजविण्यास कारणीभूत ठरते. पालकच संस्कारी नसतील तर त्यांची संतती कशी संस्कारी निघेल ? आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? अशीच काहीशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण एखादे झाड जगविण्याचा निश्चय केला असेल तर त्याला अगदी लहान असल्यापासून त्याची काळजी घेतो. योग्य खतपाणी घालतो. त्याला इतर प्राण्यापासून वाचविण्यासाठी कुंपण करतो. त्याची चांगली वाढ झाल्यावर त्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरी चालेल. मात्र लहानपणी खूप काळजी घ्यावी लागते. जर तसे झाले नाही तर झाडांची योग्य वाढ होत नाही. असेच काही आपल्या घरातील लहान मुलांच्या बाबतीत लागू पडते.

अगदी लहान असतांना मुलांवर योग्य संस्कार आणि सवयी त्यांना लावल्या तर भविष्यात त्याच बाबीवर ते जीवन जगतात. वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत त्यांच्या कडे लक्ष दिल्यास त्यानंतर त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. येथे सुद्धा काही मंडळी अति करतात. मुलांकडे लक्ष द्यायचे आहे याचा अर्थ वेगळाच घेतात आणि आपल्या मुलांची अति काळजी घेतात. अति संरक्षण देतात. त्यामुळे मुले भित्री किंवा डरपोक बनतात. हे ही घातक आहे. म्हणून पालकांनी सर्व बाबीवर खूप विचार करून त्यांच्याशी वर्तन करावे. एखादी गोष्ट मुलांना करण्यास सांगण्यापूर्वी आपण स्वतः ते करून पाहणे अत्यावश्यक आहे. मी सांगतो लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला या उक्तीप्रमाणे काम केल्यास मुलांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. ज्या चांगल्या सवयी मुलांना लावायचे आहेत त्या सवयी सर्वप्रथम पालकांनी स्वीकारले पाहिजे. जेवण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे हे वारंवार सांगण्यापेक्षा पालकांनी प्रत्यक्षात तशी कृती रोज करीत गेल्यास ते सांगण्याची गरज भासणार नाही. खोटे बोलू नका ही शिकवण कोणती गोष्ट सांगून किंवा दाखवून त्यास कळणार नाही. मुलांसमोर आपण खरे बोलू लागलोत की तेच संस्कार आपोआप त्याच्यावर पडतात.

बऱ्याच वेळेला पालक आपल्या संततीची इतरासमोर तक्रार करतात. त्याऐवजी त्याची स्तुती करत जाणे चांगले आहे. त्यांच्यातील उणिवा लोकांसमोर दाखविल्यास त्यांची मन दुखावल्या जातात. म्हणून पालकांनी आपल्या संततीमध्ये असलेले बेस्ट शोधून काढून त्याला प्रेरणा देणे आवश्यक आहे. एक शाबासकी खूप मोठे कार्य करून जाते तर एक वेळा केलाला अपमान सर्व चांगल्या कामावर पाणी फेरते. म्हणून संपत्ती कमाविण्याच्या फंद्यात न पडता चांगली व संस्कारी संतती निर्माण करण्यात लक्ष द्यावे, असे वाटते.

मोबाईल – 9423615769