अमरावतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. व्यापाऱ्यांने संत्र्याचे पैसे न दिल्याने शेतकऱ्यानी राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून आत्महत्या केली आहे. लहान भावाच्या आत्महत्येचा धक्का पचवत असतानाचं मोठ्या भावाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यानेही प्राण सोडला. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही भावांना अखेरचा निरोप देऊन या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशोक पांडुरंग भुयार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेतात एक व्यक्ती मृतावस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली होती. मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या कपड्यात एक चिठ्ठी सापडली. यामध्ये संत्र्याचे व्यापारी तसंच अंजनगाव पोलिसांकडून झालेली मारहाण आणि पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेता परत पाठवल्याची माहिती उघड झाली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शेतकरी गेला असता तेथेही शेतकऱ्याची तक्रार न घेता पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली व तशी चिठ्ठी देखील लिहून ठेवली. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गावकरी व नातेवाईकांनी आंदोलन केल्यानंतर रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व 2 संत्रा व्यापारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.