केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसमोर कृषी कायद्यातील संशोधनाबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारचा हा संशोधनाबाबतचा प्रस्ताव देखील साफ फेटाळून लावला आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम आहेत.
“आतापर्यंत खूप चर्चा झाली. आम्हाला आता सरकारसोबत कोणतीही बैठक नको, लेखी स्वरुपात उत्तर हवंय.”, अशी भूमिका शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात गेल्या तीन तासांपासून अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तर शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी संघटनांचे एकूण ४० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारसोबतच्या या बैठकीआधीच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची घोषणा केलेली आहे. याशिवाय, आज सरकारने कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली नाही, तर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.