‘मराठा आरक्षणासाठी तात्काळ पूनर्विचार याचिका दाखल करा’

6

मराठा आरक्षण प्रश्‍नी तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करून केंद्र सरकारकडे हा विषय लावून धरावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी संभाजी सेनेच्यावतीने विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच कोविड-19 च्या आजारावर उपचार घेणार्‍या महात्मा फुले जीवनदायी योजना लागू असणार्‍या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णांवर योजनेमधूनच उपचार करावा, असे आदेश माननीय उच्च न्यायालय यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या बाजूनी दिले आहेत.

परंतु महात्मा फुले जीवनदायी योजना लागू असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी बेड अथवा जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही इतर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करावा लागला. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांवर प्रचंड आर्थिक संकट आलेले आहे.

अनेक गरीब रुग्ण कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीत उपचार करणार्‍या सर्व रुग्णांना सरसगट महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ द्यावा आणि खाजगी रुग्णालयांमध्ये केलेल्या उपचाराचे बिले तात्काळ परत द्यावीत, अशीही मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.