अखेर ‘कुडली’ प्रकरणात प्रेमविरांविरुद्ध खुनाचा गुन्हा..! मरखेल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, केवळ एका महिन्यातच लावला छडा

एस. आय. शेख

नांदेड : सुरुवातीला हरवल्याची नोंद, मृतदेह सापडल्यावर आकस्मिक मृत्यू यानंतर मात्र खून झाल्याचा गुन्हा असा काहीसा अवघड तपास करण्याचे कौशल्य मरखेल ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, उपनिरीक्षक अजित बिरादार यांनी दाखवले. कुडली (ता. देगलूर) येथील जगदीश जाधव या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अखेर जवळपास दीड महिन्यानंतर मरखेल पोलिसांनी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या जगदीशचा काटा काढणाऱ्या ‘त्या’ दोन प्रेमवीरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

प्राप्त माहितीनुसार, यातील मयत जगदीश हणमंतराव जाधव (वय : २७) हा तरुण नववर्षी दि. १ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास घरातून बाहेर गेला. मात्र परत आला नव्हता. घरच्या मंडळीनी शोधाशोध करूनही मिळून आला नसल्याने मरखेल पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली होती. यानंतर दि. २६ जानेवारी रोजी जगदीश याचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी मरखेल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासावर ठेवले होते.

दरम्यान कुडली गावातील शुभम मोहनराव चिलमपाडे (वय : २२) व अनुसया संतोष गोंदे (वय : ३२) या दोघांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती जगदीश जाधव यास होती. याआधारे जगदीश हा अनुसया हिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करीत होता. या कारणामुळे संतापलेल्या शुभम व अनुसया यांनी जगदीशला दि. १ जानेवारी रोजी मध्यरात्री कुडली शिवारात बोलावून मिरचीची पूड टाकून, गुप्तांग- तोंडावर लाथा मारून पायाने गळा घोटला. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून, मृतदेह चंदरबाई जाधव यांच्या शेतात नेऊन टाकला.

दरम्यान मरखेलचे पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार यांच्या टीमने या प्रकरणात सायबर सेलचे पोलीस कर्मचारी महेश बडगू यांच्या तांत्रिक साहाय्याने हणेगाव बीटचे जमादार मोहन कनकवळे, परशुराम इंगोले, पोलीस कर्मचारी गजानन जोगपेठे, चंद्रकांत पांढरे यांच्यासह या प्रकरणातील धागेदोरे मिळविले. शुभम चिलमपाडे यास बोरगाव (जिल्हा लातूर) तर अनुसया गोंदे हिस ममदापुर (कर्नाटक) येथून ताब्यात घेतले. या किचकट प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार यांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करून, आरोपींना ताब्यात घेतले. उपरोक्त दोघांवर खुनाचा नोंदविला असून, पुढील तपास सपोनि. आदित्य लोणीकर हे करीत आहेत. उपरोक्त दोघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.