राज्यातील ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजाराचे अर्थसहाय्य

17

राज्यात केाविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या राज्यात १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. .

या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होत असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आली असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

गेल्या वर्षीही कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.