देशातील पहिले ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने दादरमध्ये सुरू !

7


मुंबई : वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे कोरोना लसीकरण सुलभ व्हावे, या हेतूने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परिसरात देशातील सर्वांत पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. दादरच्या कोहिनुर स्क्वेअरच्या पार्किंग लॉटमध्ये सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सदा सरवणकर, पालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचुन लस घेणे जिकीरीचे ठरत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या वतीने ड्राईव्ह इन कोरोना लसीकरण केंद्राची संकल्पना मांडण्यात आली. दादरच्या या केंद्रातील ड्राईव्ह इन सुविधेचा लाभ दिवसाला सुमारे 250 गाड्यांमधील नागरिक घेऊ शकतील.


आता याठिकाणी केवळ 45 वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच ही सुविधा उपलब्ध असून लवकरच 18 वर्षांवरील सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. कोहिनुर पार्किंग लॉट मधील या केंद्रात ड्राईव्ह इन लसीकरण सुविधे व्यतिरिक्त असलेल्या 7 बूथच्या माध्यमातून दिवसाला 4 हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.