पाथरीत पावणे पाच लाखाचा गुटका जप्त; एकास घेतले ताब्यात

6

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथरी येथील सेलू कॉर्नर परिसरातील एका गोडाऊनमधून चार लाख 80 हज़ार 240 रुपयांचा गुटका सोमवारी पहाटे जप्त करीत एकास ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांना पाथरीतील सेलू कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटका साठून ठेवला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार पवार, फौजदार खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, आदींच्या पथकाने सोमवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे सेलू कॉर्नर परिसरात असलेल्या गोदामात छापा टाकला. त्यावेळी तेथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुठक्याचा साठा पोत्यात भरून ठेवल्याचे निदर्शनास आले.

पथकाने सर्व साठा जप्त करित गुटक्याची मोजदाद केली. तब्बल चार लाख 80 हज़ार 240 रुपयांचा गुटक्याचा साठा असल्याचे दिसून आले. पथकाने त्या मुद्देमालासह अवेस खान यास ताब्यात घेतले. या प्रकारणी पाथरी पोलिस ठाण्यात तिघंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.