‘दिव्यांगाकरिता असलेला पाच टक्के निधी त्वरित दिव्यांगाच्या खात्यावर जमा करण्यात यावा’
परभणी महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्याकडील दिव्यांगाकरिता असलेला पाच टक्के निधी त्वरीत दिव्यांगाच्या खात्यावर जमा करण्यात यावा, अशी मागणी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सत्यम दिव्यांग संघटनेचे संजय वाघमारे,संतोष जोंधळे,रामराज कांगने,सुनील लहाने, आदीनी जिल्हाधिका-यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जिल्हा परिषद मार्फत दिव्यांगाना गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन वाटप करण्यात येत होते ते अद्यापही दिलेले नाही ते त्वरित द्यावी, जिल्हाधिकारी कार्यालय कडून ऑनलाइन अर्ज धान्य किट साठी मागविण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून अद्यापही मिळाले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँक कडून मिळणारे दिव्यांगाचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत देण्यात यावे, दिव्यांग बांधवाना विनाअट घरकुल योजना हे नावापुरती राहिली आहे, ती अंमलात आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दि.31 मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.