येत्या 1 मे पासून महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घ्यावी, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निधी देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेत 18 वर्षांवरील सर्वांना राज्य सरकारमार्फत मोफत कोरोना लस देण्यात यावी. यासाठी साधारण साडे पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 79 हजार कोटींच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत. राज्य सरकारने मोफत लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या या निधीचा वापर करावा. तसेच राज्य सरकारने पालिकेचा हा निधी काही वर्षांनी परत द्यावा, असेही खासदार शेवाळे यांनी सुचविले आहे.