परप्रांतीय कामगार परतीच्या मार्गावर …..

15

महाराष्ट्रात कोरोन‍ा रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतेच आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून रात्रीच्या जमावबंदीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला. परिस्थिती आटोक्यात न आल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नसणार असेसुद्धा मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी सांगीतले. परिणामी पुन्हा टाळेबंदी होऊन गेल्या वर्षीसारखे हाल होऊ नयेत याकरिता मोठ्या शहरातले परप्रांतीय मजुर आपल्या मुळ गावी परतीच्या मार्गावर आहेत.

महाराष्ट्रातल्या बहूतेक मोठ्या शहरात रुग्णांची संख्येत वाढ होते आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. आता रात्रीची जमावबंदी असल्यामुळे संध्याकाळच्या दरम्यान व्यवसाय करणार्‍यांच्या छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला गाडी लाऊन छोटा-मोठा व्यवसाय करणार्‍यांवर पुन्हा कोरोनाने ऊपासमारीची वेळ आणली आहे.

गेल्या वर्षी संपूर्ण लॉकडाऊनमुळे घसरलेली अर्थगाडी अद्यापही सुरळीत स्थितीत आलेली नाही. मागणीमध्ये प्रचंड घट आहे. त्याचा परिणाम ऊत्पादकतेवर होत असून अप्रत्यक्षरित्या तो कामगारांवरदेखील होतो आहे. अनेकठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के कामगार‍ांकडूनच काम करुन घेतले जात आहे. परिणामी रोजगारांत घट होते आहे.

मागिल वर्षी अचानक लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या झळा सर्वात जास्त मजुर वर्गास सोसाव्या लागल्या होत्या. गेल्या वर्षीचा काळा आठवल्याससुद्धा मजुरांच्या अंगावर काटा ऊभा राहतो. महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनेच जातो आहे. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये ही चिंता मजूरांना लागली आहे. रोजगारात होणारी घट, कडक निर्बंध आणि लॉकडाऊनची भिती यांमुळे पुन्हा आपल्या मुळगावी परतण्याचा विचार मजुर करत आहे.