मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनीही सभेला संबोधित करताना आसिफ शेख रशीद यांनी काँग्रेस मधून राष्ट्रवादीत येण्याचा घेतलेला निर्णय हा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या सहमतीनंतर झाला असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक राजकारणातील काही गोष्टींमुळे आसिफ शेख यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
आसिफ भाईंनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे त्यामुळे या पक्षात आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असा विश्वास त्यांनी सर्व नवीन सदस्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणासोबतही दुजाभाव होत नाही. आसिफ शेख रशीद यांनी आपल्या पक्षात येण्याची भूमिका ही अत्यंत विचारपूर्वक घेतली आहे. मालेगाव शहराच्या विकासासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्षात येताना त्यांनी मालेगाव शहरातील अनेक प्रश्नांकडे आमचे लक्ष वेधले आहे, त्या प्रश्नांना योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही देत नवीन सदस्यांचे अजितदादांनी पक्षात स्वागत केले.