हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.हर्षवर्धन जाधव न्यायालयासमोर बाजू मांडताना म्हणाले की, “आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.यानंतर अमन चड्डा यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना बुधवारी अटक करुन सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं गेलं.हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोपही केला. याशिवाय मारहाणीची घटना सोमवारी घडलेली असताना मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला असं सांगत यामागे राजकीय हात असल्याचा दावा त्यांनी केला.