भाजपचे नेते आणि माजी खासदार दिलीप गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.गांधी यांच्यावर नगर अर्बन बँकेत पैशांचा अपहार केल्याप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दिलीप गांधी यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यंदा पक्षाने तिकीट कापल्याने गांधी नाराज होते. त्यामुळे त्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द देखील देण्यात आला होता. मात्र आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या समोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहे.
दिलीप गांधी यांच्यासह घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे आणि बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली होती.
आरोपींनी अपहार केलेली रक्कम तब्बल तीन कोटी एवढी आहे. आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून अवास्तव 13 खोटी कर्ज प्रकरणे मंजूर केली. यात तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.