पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार केला परत

18

कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. शेतकरी सरकारबरोबर चर्चाही करीत आहेत. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल(९२) यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पद्मविभूषण परत केला आहे. बादल यांना हा पुरस्कार २०१५ मध्ये मिळाला होता. बादल यांचा पक्ष, शिरोमणी अकाली दल, २२ वर्ष एनडीएसोबत होता, पण त्यांनी शेती कायद्याच्या निषेधार्थ सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी १७ सप्टेंबरला हरसिमरत कौर बादल यांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.

आपला पद्मविभूषण सन्मान परत करत असताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले, ‘मी एवढा गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो या शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात अर्थ नाही.’ तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोठे दुःख झालेय. त्यांच्या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीने सादर केले जातेय हे अतिशय दुःखद असल्याचेही बादल म्हणाले.