छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे.
या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या कामाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पर्यटन मंत्री ठाकरे यांनी आभार मानले आहेत.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.शिवरायांचे कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केले जाईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.
अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपींगची कामे आदी विविध कामे केली जाणार आहेत.