सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, लसीकरण केल्याने आपल्या प्रकृतीवर कुठलाही विपरित परिणाम होत नाही उलट कोरोनाविरूध्द लढण्यासाठी आपले शरीर सज्ज होते. त्यामुळे लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, यासाठी युवकांनी पुढे यावे, घरातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी झरी ता.परभणी ग्रामस्थांना केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर मंगवारी आपल्या झरी येथे आले होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. कोरोनापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, यावर त्यांनी मार्गदर्शन करतानाच लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपल्या साध्या सरळ सर्वांना समजेल अशा भाषेत ग्रामस्थांशी संवाद साधला.
कुठलाही मोठेपणा न करता नेहमीप्रमाणे ते अचानक गावात दाखल झाले. दाखल होताच गावातील चौकात सर्वांना बोलावून घेत सोशल डिस्टसिंग पाळत ओट्यावर बसून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना लसीकरण का करावे, त्याचे फायदे कोणते याबाबत मार्गदर्शन केले.