लवकरच कर्नाटकमधील बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. याचसंदर्भात बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ईश्वरप्पांनी भारतीय जनता पार्टी निवडणुकीमध्ये कोणत्याही मुस्लीम उमेदवाराला तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केलंय. बेळगाव हे हिंदूंचे केंद्र असून त्याचे समर्थन करणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल असे ईश्वरप्पा म्हणाले आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. “आम्ही हिंदू समुदायातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कुरुबा, लिंगायत, वोक्कलिबा किंवा ब्राह्मण समाजातील कोणत्याही व्यक्तीला आम्ही तिकीट देऊ. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुस्लिमांना आम्ही तिकीट देणार नाही,” असं ईश्वरप्पा म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “भाजपा वगळता कोणत्याही पक्षामध्ये लोकशाही नाहीय,” असंही ते म्हणालेत.