‘कष्टकऱ्यांच्या’ खात्यात ५ हजार द्या; भाजप शिष्टमंडळाची राज्यपालांची भेट घेऊन साकडे

28

भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे सामान्यांचे हाल झाले आहेत. सामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा. कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये द्या, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने सरकारकडे केली आहे. शिवाय, राज्यपालांकडे वाढीव लस मिळण्यासंदर्भात देखील चर्चा केली. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत चर्चा झाली.

या शिष्टमंडळात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार विद्या ठाकूर, आमदार पराग अळवणी, आमदार पराग शाह आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने घाईत लॉकडाऊन घोषित केल्याने व्यापाऱ्यांना काय दिलासा देणार? हे स्पष्ट करावं. इतर राज्यांनी कोरोना काळात विविध पॅकेज जाहीर केलेत. असंघटीत कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये टाका. सरसकट लॉकडाऊन केल्यास व्यापारी, शेतकरी आणि कष्टकरींचा उद्रेक होईल, असं मत शिष्टमंडळाने राज्यपालांकडे व्यक्त केलं.

केंद्राने जवळपास १ कोटी ६ लाखांच्या वर लसी दिल्या. पण राज्यातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. मुख्यमंत्री भांबावले आहेत. त्यामुळे लसींबाबत राज्यपालांना विनंती केली. राज्यपालांनी वाढीव लसी कशा मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती भाजपा शिष्टमंडळाने केली आहे.