महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकर्यांना तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे नुकताच घेण्यात आला आहे. सहकार आणि कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यासोबतच अद्यापपर्यंत ज्या शेतकर्यांची कर्जमाफी झालेली नाही अशांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार असल्याची शक्यता आहे.
एकीकडे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून दिल्ली सिमेवर नविन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकर्यांना ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेऊन कर्जपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. कोरोनामुळे शेतकर्यांच्या पाठीचा कणा मोडला आहे. या कठीणकाळात शेतकर्यांपर्यंत प्रत्येक मदत पोहचवण्यास राज्य सरकार कटीबद्ध असणार आहे. असे कृषीमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक प्रोत्साहन योजनेच्या पार्श्वभूमिवर निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी १ लाख मुदतीपर्यंतचे बिनव्याजी स्वरुपात दिले जातात. तसेच ३ लाखांपर्यतच्या कर्जावर दोम टक्के व्याज लावण्यात येतो. मात्र यंदा खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.
कर्जवाटपाची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी, प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यतील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला केसीसी रूपे डेबिट कार्ड वितरित करावे आणि त्याद्वारे त्यांना एटीएममधून रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचनासुद्धा यावेळी करण्यात आली आहे.